logo

Monday 23rd of January 2017

Books

Horizontal SlideShow Module v1.8 by JT.

Polls

Which Book of ASG you like most?
 

1.वेल्‍थ ऑफ नेशन्‍स - Arthat PDF Print E-mail
Written by deepa   
Wednesday, 05 January 2011 12:27

1.वेल्‍थ ऑफ नेशन्‍स

डम स्मिथ वेल्थ ऑफ नेशन्स

अर्थशास्त्रात डम स्मिथचं `वेल्थ ऑफ नेशन्स' हे एक लँडमार्क पुस्तक ठरलं. त्याच्याशी बरोबरी करु शकेल असं एकच पुस्तक तब्बल 100 र्षानंतर लिहिलं गेलं आणि ते म्हणजे कार्ल मार्क्सचं `दास कॅपिटल'! आणि खरंतर असंही म्हणता येईल की `वेल्थ ऑफ नेशन्स' निर्माण झालं नसतं तर कार्ल मार्क्सचं `दास कॅपिटल'ही तितकं प्रभावी झालं नसतं!

`वेल्थ ऑफ नेशन्स'वर ह्यूम, लॉक, स्टुअर्ट, पेटी, कँटिलॉन, त्यूर्गो, केने यांच्या विचारांचाही खूपच प्रभाव पडला होता. फरक इतकाच की या प्रत्येकानं जणू काही क्रिकेटच्या किंवा फुटबॉलच्या मोठय़ा मैदानावरच्या एका लहानशा भागावर प्रकाश टाकला होता. तर स्मिथनं संपूर्ण मैदानच लख्ख प्रकाशानं झगमगवून टाकलं होतं! थोडक्यात त्यानं अनेक गोष्टींचे परस्परसंबंध दाखवून पोलिटिकल इकॉनॉमीचं क्षेत्र पूर्णपणे उलगडून दाखवलं होतं, उजळून टाकलं होतं! आणि म्हणूनच ते एक मास्टरपीस ठरलं.

`या पुस्तकात डम स्मिथनं गोष्ट सांगावी तसं अर्थशास्त्र शिकवलंय. लहान मुलाला हाताशी धरून खाचखळगे सांभाळत आपण हसत खेळत चालत घेऊन जातो, तसं इथे स्मिथ आपल्याला करतो. मधेच तो अवघड जागी थांबतो आणि एखादी गोष्ट सांगून ती सोपी करुन सांगतो' असं 1843 सालच्या स्मिथच्या `वेल्थ ऑफ नेशन्स'ला प्रस्तावना लिहिणा-या वेकफील्डनं म्हणून ठेवलंय. पण यात अर्थशास्त्राशिवाय अनेक गोष्टींविषयीही स्मिथ चर्चा करतो. समाजशास्त्र, नैतिकता, कविता अशा अनेक विषयांत तो लीलया विहार करतो. फक्त `चांदी' या विषयावर त्यातली 75 पानं आहेत. मर्कंटिलिझमवर तर 200 पानं! त्यातला प्रत्येक युक्तिवाद एवढा सखोल आहे आणि त्यात स्मिथनं इतकी उदाहरणं दिली आहेत की वाचक त्यात अडकतच जातो!

यात स्मिथ पिळवणूक झालेल्या गरिबांविषयीही आस्था आणि कणव दाखवतो. जरी वाढत्या उद्योगविश्वानं आणि भांडवलदार वर्गानं स्मिथला आपला पुरस्कर्ता मानला असला तरीही त्याचं मन तळागाळातल्या माणसांकडे झेपावत असे. `कष्टक-यांचे पगार वाढले तर किंमती वाढतील आणि त्याचा देशातल्या विक्रीवर आणि देशाबाहेरच्या निर्यातीवर वाईट परिणाम होईल' अशी मालकवर्ग नेहमीच तक्रार करतो. पण आपण स्वतः भरमसाठ नफा घेतल्यामुळेही तोच परिणाम होतो याविषयी मात्र तो प्‍प रहातो' अशीही टीका स्मिथनं केली आहे. किंवा त्याच उद्योगातील लोक सहसा एकत्र भेटत नाहीत, अगदी मजा मारण्यासाठीही नाही आणि एकत्र आलेच तरी ते एकत्र येऊन वस्तूंच्या किंमती कशा वाढवता येतील याविषयीच चर्चा करतात असं स्मिथ म्हणे. खुल्या स्पर्धेच्याआड येणा-या कुठल्याही गोष्टीचा स्मिथला तिटकारा होता. डम स्मिथच्या म्हणण्याचे परिणाम केव्हातरी, कुठेतरी होणार होते. गंमत म्हणजे एका शतकानंतर अमेरिकेमधे शेरमनक्ट आणि इतर काही कायदे मंजूर झाले. त्यानुसार एकाच उद्योगातल्या अनेक उद्योजकांना अगदी मौजमजेकरता जरी एकत्र आलं तरी वस्तूंच्या किंमती ठरवणं तर दूरच राहो, त्यांच्याविषयी नुसती चर्चाही करता यायची नाही.

स्मिथचं पुस्तक आशावादी होतं. आणि गंमत म्हणजे हा आशावाद माणसाच्या दयाळूपणातून निर्माण होता प्रत्येक माणसाच्या स्वार्थीपणातून निर्माण झाला होता! प्रत्येकजण स्वतःची स्थिती सुधारण्यासाठी योग्य तो उद्योग किंवा नोकरी करेल असं स्मिथनं गृहीत धरलं होतं. याविषयी स्मिथ खूपच झकास लिहितो. तो म्हणतो, ``कुत्र्यांना आपल्याजवळच्या हाडांची देवाणघेवाण एकमेकांत रु व्यापार करताना कुणीही बघितलं नाहीये. पण माणसं मात्र तो (आपल्याकडल्या वस्तूंचा व्यापार) सतत करत असतात. आपली स्थिती सुधारावी अशी इच्छा माणसाला जन्मापासून असते आणि मरेपर्यंत ती टिकते. या स्वहिताच्या, स्वार्थाच्या प्रेरणेमुळेच जग चालतं, पुढे जातं. खाटिक, पेयं बनवणारा, बेकर यांच्या दयाळूपणामुळे आपल्याला जेवण मिळेल ही अपेक्षा करणंही चूक आहे. पण ते सगळे स्वहित सांभाळतात म्हणूनच आपल्याला खायला मिळतं. थोडक्यात प्रत्येकानं स्वतःचं हित आणि स्वार्थ याकडे लक्ष दिलं तर सगळ्यांचंच त्यातून कल्याण होईल'' असं तो म्हणतो. आणि हे सगळं बाजारपेठेच्या यंत्रणेतून होतं. कोणाच्या परोपकारी वृत्तीतून किंवा त्यागातून नव्हे. उदाहरणार्थ समजा अनेक कारखानदार हातमोजे तयार करताहेत. आता जास्त नफा मिळवण्यासाठी जर त्यातल्या एकानंच किंमत वाढवली तर लोक त्याच्या इतर स्पर्धक कारखानदारांकडून हातमोजे घ्यायला सुरुवात करतील. त्यामुळे तो अव्वाच्या सव्वा किंमत वाढवूच शकणार नाही. म्हणजे कारखानदार आणि लोक हे सगळेच जरी स्वहिताच्या दृष्टीनंच वागत असले तरी त्यात सगळ्यांचंच भलं होतं. तसंच बाजारपेठेची यंत्रणा कुठल्या गोष्टीचं किती उत्पादन करायचं हेही ठरवते. समजा लोकांची मागणी हातमोज्यांच्याऐवजी बुटांची वाढली तर बुटांची मागणी वाढूनही त्यांचा पुरवठा कमी असल्यानं त्यांची किंमत वाढेल. त्यामुळे आता बूट विकून जास्त नफा मिळायला लागेल. त्यामुळे बरेच कारखानदार बूट जास्त बनवायला लागतील. त्यामुळे बुटांचं उत्पादन वाढून पुरवठा वाढल्यामुळे त्यांची किंमत कमी होईल. आणि त्यामुळे पुन्हा ग्राहकांचाच फायदा होईल. अशा -हेनं किती उत्पादन करावं आणि ते केवढय़ाला विकावं हे बाजारपेठेचा अदृश्य हात ठरवत असतो आणि त्यातूनच सगळ्यांचं भलं होतं.

शिवाय या बाजारपेठेत असंख्य स्पर्धक आहेत, आणि त्यांना प्रत्येक वस्तू उत्पादन करण्याची सारखीच संधी आहे असं गृहीत धरलं तर या व्यवस्थेमुळे सगळ्या वस्तूंचं योग्य प्रमाणात, चांगल्या दर्जाचं आणि कमीतकमी किंमतीला उत्पादन स्मिथच्या मॉडेलमधे होत होतं. कारण एखाद्या कंपनीच्या एखाद्या वस्तूची किंमत जास्त असेल किंवा तिचा दर्जा कमी असेल तर ग्राहक त्या कंपनीकडून वस्तू विकत घेण्याऐवजी त्या कंपनीच्या स्पर्धकाकडून वस्तू विकत घेतील आणि मग ती कंपनी स्पर्धेमधून बाहेर तरी फेकली जाईल किंवा तिला नवं तंत्रज्ञान वापरुन मालाचा दर्जा वाढवावा लागेल आणि शिवाय किंमत कमी करावी लागेल. थोडक्यात स्पर्धेमुळे आपोआपच तांत्रिक प्रगती होते आणि मालाचा दर्जाही सुधारतो. आणि हे करण्यासाठी कुठलंही सरकार किंवा कुठलंही नियोजन करणारी बाहेरची यंत्रणा लागत नाही. बाजारपेठेचे नियम (म्हणजेच बाजारपेठेचे अदृश्य हात) सगळं आपोआप हे सगळं साध्य करतात!

स्मिथच्या या अदृश्य हाताविषयी नंतर बरीच चर्चा झाली. काहींनी त्याची `धार्मिक मूल्‍यं' तपासून बघितली. तर काहींनी त्याचा संबंध शेक्सपिअरच्या `मॅग्बेथ' या नाटकाशी लावला. या नाटकात `रक्ताळलेल्या अदृश्य हाताचा (ब्लडी अँड इन्व्हिजिबल हँड)' उल्लेख होता. यावरनच स्मिथनं हा वाक्प्रचार उचलला असावा असं मग अनेकांना वाटलं.

स्मिथनं त्याच्या मॉडेलमधे याशिवाय आणखी एक गोष्ट मांडली. ती म्हणजे श्रमविभागणीचं (डिव्हिजन ऑफ लेबर) महत्त्व. `वेल्थ ऑफ नेशन्स'च्या पहिल्या भागात तो श्रमविभागणी आणि त्याचे फायदे यांच्याविषयी बोलतो. `जितकी बाजारपेठ समृद्ध होईल आणि वाहतुकीमुळे ती जशी सगळीकडे पसरेल तशी श्रमविभागणीची गरज आणि त्यामुळे प्रत्यक्ष श्रमविभागणी वाढेल' असं तो म्हणतो.

स्मिथनं खरंतर हे पुस्तक इंग्लंडची आर्थिक वाढ का झाली हे सांगण्यासाठी लिहिलं होतं. शंभर वर्षापूर्वी मात्र हॉलंड आणि नेदरलंड (हे त्यावेळी वेगवेगळे देश होते!) या देशांमधे इंग्लंडपेक्षा जास्त सुबत्ता होती. पण कालांतरानं 1723 साली जेव्हा स्मिथ जन्मला तोपर्यंत इंग्लंडनं हॉलंड/नेदरलँड यांची बरोबरी केली होती, आणि 1776 सालापर्यंत म्हणजे `वेल्थ ऑफ नेशन्स' प्रकाशित होण्याच्या सुमारास मात्र इंग्लंडनं हॉलंड/नेदरलँड आणि इतर देशांनाही खूपच मागे टाकलं होतं. मग असं का झालं असावं याच्या कारणांचा अॅडम स्मिथ शोध घेत होता.

इंग्लंडमधे हवामान आणि जमीन यांची अनुकुलता इतर देशांपेक्षा कमी असूनही या प्रगतीचं कारण काय असावं? बरंच डोकं खाजवल्यावर स्मिथला त्याच उत्तर श्रमविभागणीत सापडलं. इंग्लंडमधे उत्पादनात श्रमविभागणी बरीच जास्त होत होती. श्रमविभागणीमुळे उत्पादकता कशी वाढते हे सांगण्यासाठी त्यानं इतिहासातलं नंतर प्रचंड गाजलेलं टाचण्यांच्या कारखान्याचं उदाहरण घेतलं. समजा अशा एका कारखान्यात दहा लोक काम करताहेत. आता प्रत्येकजण टाचण्या बनवण्यासाठी लागणारी सगळी कामं करत असेल तर कारखाना दरदिवशी फक्त काही शेकडाच टाचण्या तयार कर शकेल. पण श्रमविभागणीमुळे मात्र उत्पादकता खूपच वाढेल. उदाहरणार्थ असं समजा की एक माणूस तार तयार करतोय, दुसरा ती सरळ करतोय, तिसरा ती कापून तिचे तुकडे करतोय, चौथा त्यातल्या प्रत्येक तुकडय़ाला एका बाजूला टोक आणतोय आणि पाचवा त्या टाचणीचं `डोकं' तयार करतोय वगैरे. या सगळ्या प्रक्रियेत प्रत्येकजण आपल्या ठराविक कामात कुशल आहे असं धरलं तर तेच काम सतत केल्यानं प्रत्येकाची उत्पादकता खूपच वाढते. यामुळे दरदिवशी तो कारखाना हजारो टाचण्या तयार करू शकेल. स्मिथच्या मते कुठल्याही वस्तूची मागणी जेवढी जास्त तेवढी ती पूर्ण करण्यासाठी उत्पादकतेची गरज जास्त असते आणि त्यामुळे श्रमविभागणीही जास्त असते. अॅडम स्मिथच्या टाचण्यांच्या कारखान्याचं उदाहरण इतिहासात अजरामर झालं असलं तरी स्मिथनं स्वतः मात्र एकाही टाचण्यांच्या कारखान्याला भेट दिली नव्हती. एका विश्वकोशात आलेल्या लेखावरूनच स्मिथनं आपल्या विचारांची जुळवाजुळवी केली होती असं `नॉलेज अँड दी वेल्थ ऑफ नेशन्स' या पुस्तकात डेव्हिड वॉर्श यानं म्हटलंय.

स्मिथच्या पुस्तकात प्रचंड आकडे किंवा समीकरणं नव्हती. त्यात एखाद्या पत्रकारानं लिहावं तशी सोपी भाषा वापरली होती. पण त्यानं मांडलेली तत्त्वं उथळ नव्हती. देशाची सुबत्ता ही स्पेशलायझेशन म्हणजेच श्रमविभागणीवर अवलंबून असते असं स्मिथनं मांडलं. अॅडम स्मिथच्याच श्रमविभागणीच्या कल्पना हेन्‍री फोर्डनं अमेरिकेत 1912 साली त्याची `मॉडेल टी' ही मोटारगाडी तयार करण्यासाठी वापरल्या होत्या आणि या पद्धतीमुळे एक संपूर्ण मोटारगाडी फक्त 93 मिनिटात तयार व्हायला लागली होती! याच तत्त्वावर पुढे मोठमोठे कारखाने निघाले. पुढे मॅनेजमेंटमधे `कोअर कॉम्पीटन्सी'च्या बाबतीत वापरलं जाणारं आणि मायकेल पोर्टर, सी.के.प्रल्हाद वगैरे मंडळींनी 1880च्या दशकात लोकप्रिय केलेलं तत्त्व हेच होतं. कुठल्याही व्यक्तीनं किंवा कंपनीनं किंवा राष्ट्रानं आपण काय करण्यात किंवा बनवण्यात कुशल आणि सर्वोत्तम आहोत ते ठरवावं आणि भारंभार सगळ्या गोष्टी करत बसण्यापेक्षा त्याच गोष्टींवर लक्ष केंद्रित करावं. म्हणजे उत्पादकता वाढते आणि असं सगळ्यांनीच केलं आणि नंतर आपल्या वस्तूंची देवाणघेवाण किंवा व्यापार केला तर सगळ्यांचीच सुबत्ता वाढते हे ते तत्त्व होतं. जनरल इलेक्ट्रिकचा जॅक वेल्शही 1980/90च्या दशकात हेच ओरडून सांगत होता. या तत्त्वांची ूल्‍यंही डम स्मिथमधे आपल्याला सापडतात.

`वेल्थ ऑफ नेशन्स'च्या दुसऱया भागात राष्ट्रीय उत्पन्नाचं मोजमाप (नॅशनल इन्कम अकौंटिंग) आणि भांडवलसंचय (कॅपिटल ऍक्युम्युलेशन) याविषयी स्मिथ बोलतो. हे सांगताना अप्रत्यक्षपणे अर्थव्यवस्थेतल्या पैसा आणि वस्तू यांच्या चक्राकार फिरण्याविषयी तो आपल्याला सांगतो.

तिस-या भागात स्मिथनं रेमच्या पाडावानंतरचा युरोपचा इतिहास उत्कृष्ट -हेनं रंगवलाय. चौथ्या भागात मर्कंटिलिस्ट विचारांवर त्यानं जोरदार हल्ले चढवलेत. व्यापारावर बंधनं घालण्याचे सरकारी प्रयत्‍न आत्तापर्यंत संपूर्णपणे कसे फसले आहेत हे त्यात दाखवलंय आणि यामध्येच मुक्त व्यापाराचा स्मिथनं पाठपुरावा केलाय. पाचव्या भागात स्मिथ पब्लिक फायनान्सच्याविषयी आपल्याला सांगतो. हे सर्व सांगण्याची स्मिथची शैली अत्यंत सुंदर आहे.

डम स्मिथ या पुस्तकात `मूल्य (व्हॅल्यू)' याविषयी बोलतो. तो `यूज व्हॅल्यू' आणि `एक्स्चेंज व्हॅल्यू' यांच्यात फरक करतो. यावेळी तो पाणी आणि हिरा यांचं प्रसिद्ध उदाहरण देतो. पाण्याची जीवनाला अत्यंत म्हणजे हि-याच्या अनेक पट उपयुक्तता असल्यानं त्याची `यूज व्हॅल्यू' प्रचंड असते, पण तरीही त्याची बाजारातली किंमत म्हणजेच `एक्स्चेंज व्हॅल्यू' मात्र हि-यापेक्षा खूपच कमी असते. हे असं का असतं हा प्रश्न अनेकांना अनेक वर्षं भेडसावत होता.

या एक्स्चेंज व्हॅल्यूविषयी बोलताना स्मिथ पुन्हा दोन कल्पना वापरतो. एक म्हणजे त्याची इक्विलिब्रियमची किंमत (याला तो `नॅचरल प्राइस' किंवा `नैसर्गिक किंमत' म्हणतो) आणि दुसरी म्हणजे `बाजारभाव (मार्केट प्राइस)'. स्मिथच्या म्हणण्याप्रमाणे प्रत्यक्ष बाजारभाव हा या `इक्विलिब्रियम प्राइस'भोवतीच मागणी-पुरवठा तत्त्वाप्रमाणे वरखाली होत असतो. जर एखाद्या गोष्टीचा पुरवठा तेवढाच असताना मागणी वाढली तर त्याची किंमत वाढते आणि जर त्याची मागणी तेवढीच असताना पुरवठा वाढला तर त्याची किंमत घटते. हेच तत्त्व मग सगळीकडे लागतं. जर एखाद्या वस्तूचा बाजारभाव हा नैसर्गिक किंवा इक्विलिब्रियम किंमतीपेक्षा जास्त झाला तर त्यात नफा जास्त मिळेल. म्हणून अनेक उद्योजक आपली उत्पादनसाधनं ती वस्तू तयार करण्यासाठी वापरतील. पण मग त्या वस्तूंचं उत्पादन जास्त झाल्यानं जर पुरवठा हा मागणीपेक्षा जास्त झाला तर पुन्हा त्या वस्तूच्या किंमती खाली येतील. म्हणजेच त्या वस्तूचा बाजारभाव हा नैसर्गिक किंमतीकडे झुकेल. असं होता होता जर बाजारभाव हा त्या वस्तूच्या नैसर्गिक किंमतीच्याही खाली गेला तर त्या वस्तूतून मिळणारा नफा कमी झाल्यामुळे पुन्हा सगळे उद्योजक आपली उत्पादनसाधनं त्या वस्तूऐवजी दुस-या कुठल्यातरी वस्तू बनवण्यासाठी वापरायला लागतील. मग त्या आपल्या पहिल्या मूळ वस्तूचं उत्पादन आणि म्हणूनच पुरवठा कमी झाला की पुन्हा त्याचे बाजारभाव वाढून ते नैसर्गिक किंमतीकडे झुकतील. अशा -हेनं हे चक्र चालूच राहील! आणि प्रत्यक्षातले बाजारभाव हे `नैसर्गिक' किंवा `इक्विलिब्रियम' किंमतीभोवती घोटाळत रहातील आणि शेवटी इक्विलिब्रियम किंमतीला स्थिरावतील आणि गंमत म्हणजे हे सगळं सरकारी हस्तक्षेपाशिवाय आपोआपच होईल! हाच तो `बाजारपेठेचा अदृश्य हात'!

डम स्मिथनं त्याच्या अर्थव्यवस्थेचं एक परिपूर्ण, भव्य चित्र उभं केलं होतं. स्पर्धात्मक भांडवलशाहीत लोकांना पाहिजे त्या गोष्टीचं, परवडेल अशा किंमतीत, चांगल्या दर्जाचं योग्य प्रमाणात उत्पादन होत रहातं. असं जो कोणी करणार नाही तो स्पर्धेतून बाहेर फेकला जातो. स्पर्धेमुळे किंमती वाजवीपेक्षा जास्त वाढल्या नाहीत तरी भांडवलदारांना नफा झाल्यानं त्यातून त्यांचा उपभोग वजा करून जे शिल्लक राहतं, त्यातून भांडवलसंचय (कॅपिटल फॉर्मेशन) होतं. यातून नवे कारखाने निघतात, रोजगार वाढतो आणि आर्थिक प्रगती होते. पण मग कामगारांना नोक-या भराभर मिळायला लागल्या की त्यांचे पगार वाढतात आणि त्यामुळे भांडवलदारांचा नफा कमी होतो आणि ते उत्पादन कमी करतात. पण हे फार काळ चालत नाही. बाजारपेठेची यंत्रणा यालाही आळा घालते. उदाहरणार्थ पगार जास्त मिळाल्यामुळे कामगारांना जास्त मुलं होतात. त्यामुळे कामगारांचा पुरवठा वाढतो. त्यामुळे त्यांचे पगार कमी होतात आणि भांडवलदारांचा नफा वाढतो आणि मग ते पुन्हा उत्पादन करायला लागतात. अशा -हेनं बाजारपेठेची यंत्रणा समाजातल्या सगळ्याच गोष्टी उत्पादन, पुनरुत्पादन, लोकांच्या मिळकती (पगार, नफा), वस्तूंच्या किंमती, कशाचं, किती उत्पादन करावं ते, मालाचा दर्जा, वापरलं जाणारं तंत्रज्ञान या सगळ्यावरच नियंत्रण ठेवते आणि त्यांच्यावर परिणाम करते. आणि मुख्य म्हणजे त्यांना इकडे तिकडे भरकटू देता त्यांना एका स्थिरावस्थेला (इक्विलिब्रियम) यायला मदत करते. आणि हे आपोआपच होतं. कुठल्याही सरकारी हस्तक्षेपाची किंवा कायद्याची गरज भासत नाही. स्मिथला सरकारची बाजारपेठेतली लुडबूड एवढी आवडत नसे की न्यायाधीशांनाही पैसे सरकारनं देता आशिलांनीच द्यावेत म्हणजे ते न्याय जास्त जलद आणि कार्यक्षम पद्धतीनं देतील असंही स्मिथ मानायचा!

स्मिथ हा औद्योगिक भांडवलशाहीच्या अलिकडला अर्थशास्त्रज्ञ होता. त्यानं प्रचंड मक्तेदारी, युनियन्स किंवा उद्योगचक्रं (बिझिनेस सायकल्स) या गोष्टी बघितल्या नव्हत्या. त्यानं औद्योगिक क्रांतीचे दुष्परिणाम, त्यातून होणारी कामगारांची प्रचंड पिळवणूक बघितली नव्हती. आणि त्यामुळे या सगळ्यांचं विश्लेषण किंवा त्यांच्यावर उत्तरं त्याच्या थिअरीजमधे आपल्याला सापडत नाहीत. पण त्याचा मानवतावाद त्याच्या काही विधानातून दिसून येतो. ज्या समाजातले बहुतांशी लोक गरीब आणि दुखी असतात, तो समाज हा सुखी आणि समृद्ध म्हणता येणार नाही. हे त्याचं विधान तर आजच्या भारताला तंतोतंत लागू आहे!

आज आपण खरंच डम स्मिथनं वर वर्णिलेल्या आदर्श जगात राहतो का? तर मुळीच नाही आणि याची तीन कारणं आहेत. एक म्हणजे आज जगभर प्रचंड मोठी मक्तेदारी आहे. त्यामुळे कंपन्या खूपच अवाढव्य झाल्या आहेत. या मोठय़ा कंपन्या लहान कंपन्यांना गिळंकृत करन आणखीनच मोठय़ा होताहेत. अॅडम स्मिथनं वर्णिलेलं आदर्श जग नसण्याचं दुसरं कारण म्हणजे ट्रेड युनियन्स. त्यांच्या संघर्षामुळे कामगारांचे पगार वाढले आहेत. हे चांगलं की वाईट हा प्रश्न जरी बाजुला ठेवला तरीही त्यामुळे बाजारपेठेचे नियम `नैसर्गिक' रहात नाहीत हे खरंच आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे सरकारचा बाजारपेठेमधे सहभाग, लुडबूड किंवा नियंत्रण. या गोष्टींमुळे बाजारपेठ ही पूर्णपणे `मुक्त' -हेनं, डम स्मिथच्या थिअरीप्रमाणे वागतच नाही.

खरंतर स्मिथला म्हणायचं होतं, `जे काही सगळं असेल ते बाजारपेठ ठरवेल. आपण त्यात मधे पडता कामा नये (लेट दी मार्केट अलोन). जे सरकार कमीतकमी गोष्टी करेल ते चांगलं सरकार'. मग सरकार काहीही लोककल्याणाच्या गोष्टी करायला लागलं तरीही हे भांडवलदार त्याच्यामधे स्मिथचं नाव घेऊन टीका करायला लागले. स्मिथला खरं तर तसं म्हणायचंच नव्हतं. शिक्षणापासून इतर अनेक गोष्टींमधे सरकारनं बरंच काही केलं पाहिजे असंच त्यांचं मत होतं. तो सरकारनं बाजारपेठेत लुडबूड करायच्या विरुद्ध होता. उदाहरणार्थ मर्कंटिलिस्ट विचारसरणीप्रमाणे आयातीवर बंधन घालणं, निर्यातदारांना बक्षीस देणं किंवा प्रोत्साहन देणं किंवा सरकारनं स्पर्धा होऊ नये म्हणून उद्योगधंद्यांना संरक्षण देणं आणि मक्तेदारी बहाल करणं किंवा कुठल्याही अनुत्पादक गोष्टींवर सरकारनं खर्च करणं यांच्या तो विरुद्ध होता. सरकारनं कल्याणकारी (वेल्फेअर) कामं करण्याच्या तो विरुद्ध नव्हता. शिवाय अॅडम स्मिथनं मुक्त व्यापाराचा जरी पाठपुरावा केला असला तरी राष्ट्रीय संरक्षण यासारख्या महत्त्वाच्या गोष्टींसंबंधातल्या उद्योगांवर बंधनं घातली तरी चालतील असं म्हटलं होतं.

स्मिथच्या थिअरीजचा वापर मात्र कारखानदारांनी पाहिजे तसा रु घेतला. कारखान्यांना रंग द्यावा, लहान मुलांना कामाला लावून त्यांची पिळवणूक करू नये अशा गोष्टींविषयी सरकारनं कायदे केले तरीही ती मुक्त अर्थव्यवस्थेत लुडबूड समजून त्यावर टीका व्हायला लागली. स्मिथचीही काही मतं आणि त्याची कारणं खूपच गंमतशीर होती. स्मिथ गुलामगिरीच्या विरुद्ध होता, पण ते खूप मानवतावादी दृष्टिकोनातून नव्हे तर गुलामगिरी नष्ट केल्यावर तीच माणसं काम करायला जास्त स्वस्त मिळतील म्हणून!

सुरुवातीला `वेल्थ ऑफ नेशन्स'कडे फारसं कुणी लक्षच दिलं नाही. नंतर मात्र त्याचा खप प्रचंडच वाढला. जवळपास सगळ्याच युरोपियन भाषांत त्याची भाषांतरं झाली. ते बाहेर पडल्यावर तब्बल आठ वर्षानंतर चार्लस् फॉक्स या `हाऊस ऑफ कॉमन्स'च्या सभासदानं ते प्रथम पार्लमेंटमधे उधृत केलं. गंमत ही की त्यानं ते पुस्तक कधीही वाचलं नसल्याचं नंतर कबूल केलं. त्या पुस्तकाला खरी मान्यता मिळायला चक्क 1800 साल उजाडावं लागलं! त्यावेळेपर्यंत इंग्रजीत त्याच्या 9 आवृत्त्या निघाल्या होत्या आणि ते युरोप आणि अमेरिका या खंडात सगळीकडे पोहोचलं होतं. त्याकाळी उगवत्या भांडवलदारांना मात्र ते बायबलसारखंच वाटलं. त्यांच्याचसाठी ते लिहिलं आहे असं त्यांना वाटायचं. इतक्या अनेक पुस्तकांचे, लोकांचे आणि विषयांचे त्यात संदर्भ दिलेले होते की या पुस्तकाची सूचीच मुळी अतिशय बारीक अक्षरात छापलेली असूनही 63 पानी होती!

स्मिथला विरोधकही होतेच. यामधे जर्मनीतल्या फ्रेडरिक लिस्ट (1789-1846)चा उल्लेख करायलाच हवा. तो क्लासिकल अर्थशास्त्रावर टीका करणा-यांपैकी अगदी सुरुवातीचा. डम स्मिथ आणि त्याच्या शिष्यांची तो `कॉस्मॉपॉलिटिन स्कूल' म्हणून चेष्टा करे. विशेषतः प्रत्येकानं स्वहितासाठी झटलं तर र्वांचा उद्धार होईल हे लिस्टला मान्य नव्हतं.

लिस्टवरून आठवण झाली. एखाद्या माणसाचं आयुष्य हे किती विचित्र असू शकतं! लिस्टचंही तसंच होतं. लिस्ट हा एक विलक्षण आसामी होता. त्यानं सरकारी कर्मचारी, पत्रकार, प्राध्यापक, रेल्वेमधला उद्योजक आणि राजकीय कार्यकर्ता असे अनेक उद्योग जर्मनी, फ्रान्स आणि अमेरिका या तीन देशात केले. कोलोनहून प्रकाशित होणा-या ऱहायनिशे त्सायटूंगमधे लिस्टला संपादकाची नोकरी मिळाली होती. पण प्रकृती अस्वास्थ्याच्या कारणानं त्यानं ती नाकारली. गंमत म्हणजे पुढे कार्ल मार्क्सनं हेच पद भूषवलं. कुठल्याशा कारणावरुन लिस्टला 10 महिन्याच्या तुंगवासाची जर्मनीत असताना शिक्षा झाली. शिक्षा चुकवण्यासाठी त्यानं मग जर्मनी सोडून परदेशी पलायन केलं. दोन र्षांनी तो जर्मनीत परत आल्यावर त्याला ताबडतोब अटक झाली आणि अमेरिकेला कायमचं स्थायिक होण्याच्या अटीवर त्याला सोडून देण्यात आलं. 1825 साली अमेरिकेत आल्यावर पहिल्यांदा शेतकरी, मग अमेरिकेतल्या जर्मन भाषेतल्या वर्तमानपत्राचा संपादक आणि त्यानंतर एका कोळशाचा खाणमालक असे अनेक उद्योग केले. 1832 साली अँड्रय़ू जॅक्सनच्या निवडणुकीसाठी त्यानं चांगला प्रचार केला म्हणून त्याला अमेरिकेचा जर्मनीतला वकील म्हणून सन्मानित करण्यात आलं. तेव्हा स्वारी पुन्हा जर्मनीत आली. यावेळी जर्मनीमधे त्यानं जर्मन रेल्वे सुधारण्यासाठी प्रयत्न केले. यात त्याला थोडंफार यश मिळालं पण कुठल्यातरी घोटाळ्यात तो अडकल्यामुळे त्याची जर्मनीतून पुन्हा हकालपट्टी झाली. यानंतर तीन वर्षं पॅरिसमधे राहिल्यानंतर 1840 साली तो पुन्हा जर्मनीला आला आणि 1841 साली त्यानं त्याचं नॅशनल सिस्टिम' हे पुस्तक प्रकाशित केलं. आणि यानंतर एका महत्त्वाच्या नियतकालिकाचा तो संपादक झाला. पण यानंतर अनेक आर्थिक घोटाळ्यात अडकल्यामुळे आणि त्याच्या राजकीय महत्त्वाकांक्षा पूर्ण झाल्यामुळे प्रचंड नैराश्यात शेवटी 1846 साली त्यानं आत्महत्या केली! लिस्टच्या विचारांचा प्रभाव अनेक दशकांनी जपानी अर्थव्यवस्थेवर आणि माओनंतरच्या डेंग झिऍओपिंग याच्या आर्थिक धोरणांवर पडणार होता.

स्मिथचं पुस्तक अनेकांच्या घरी फक्त शोभा वाढवण्यासाठी ठेवलेलं असलं तरी ते वाचलं मात्र फारसं गेलं नाही. पण त्यातले विचार जणू काही `नैसर्गिक नियम' किंवा `राज्यघटनेतली कलमं' असल्यासारखीच अबाधित आणि अभेद्य आहेत असं मात्र त्यानंतर मानलं गेलं ते जवळपास आजपर्यंत! यामुळेच अॅरिस्टॉटलचं `फिजिका', `टॉलेमीचं `अल्मागेस्ट' न्यूटनचं `प्रिन्सिपिया', हार्वेचं `मोशन', फ्रँकलिनचं `इलेक्ट्रिसिटी', लेव्हायजेचं `केमिस्ट्री', ल्येलचं `जिऑलॉजी' आणि डार्विनचं `ओरिजन ऑफ स्पीशीज' या युगप्रवर्तक पुस्तकांच्या यादीत डम स्मिथचं `वेल्थ ऑफ नेशन्स' हे पुस्तक जाऊन बसलं!

डम स्मिथचं मूल्यमापन आपण कसं करायचं? तो भांडवलशाहीच्या अगोदरचा अर्थतज्‍ज्ञ होता. त्यामुळे विकसित भांडवलशाही, त्यातली मक्तेदारी, उद्योगचक्रं (बिझिनेस सायकल्स), अरिष्टं याविषयी तो सखोल भाष्यं करू शकला नाही. तसंच औद्योगिक क्रांतीनंतर कामगारांची पिळवणूक किती भयानक होईल याची तो कल्पना करू शकला नाही. कामगारांना पगार नेहमी कमीत कमी (सबसिस्टन्स वेजेस) मिळतील असं मात्र त्याला वाटायचं. एवढं असलं तरी तो काळाच्या खूप पुढे असलेला अर्थतज्‍ज्ञ होता यात शंकाच नाही. आधुनिक अर्थशास्त्राचा त्याला पितामह म्हणतात ते काही उगाच नाही!

 

Created by Apoorv Deshmukh  Designed by Deepa Deshmukh