logo

Monday 23rd of January 2017

Books

Horizontal SlideShow Module v1.8 by JT.

Polls

Which Book of ASG you like most?
 

एका अवलियाची खाद्यभ्रमंती-दीपा देशमुख PDF Print E-mail
Written by deepa   
Thursday, 06 January 2011 07:11

एका अवलियाची खाद्यभ्रमंती

गाणं आणि खाणं यासाठीच माझं जगणं...’ असं म्हणणारा एक अर्थतज्ज्ञ, एक संगणकतज्ज्ञ, एक व्यवस्थापनतज्ज्ञ, एक संगीतप्रेमी आणि एक लेखक जेंव्हा हे विधान करतो़, तेंव्हा ही सगळी वेगवेगळी मंडळी नसून ही एकच व्यक्ती आहे आणि ती कोण हे अर्थातच तुम्ही जाणलं असेलच. या सगळ्याच क्षेत्रातली मुशाफिरी करणारा हा अवलिया गाण्यातला कानसेन तर आहेच पण त्याचबरोबर तानसेनही आहे. वेगवेगळ्या टीव्ही चॅनेल्सवरील अनेक कार्यक्रमातून आपण हे सारं अनुभवलेलं आहेच. ‘संगणकयुग’, ‘नादवेध’, ‘बोर्डरुम’, ‘किमयागार’, ‘झपूर्झा’, ‘अर्थात’ (लोकसत्तामधील सदर जे आता लवकरच पुस्तकरुपात प्रसिध्द होत आहे), तंत्र-मंत्र, बखर संगणकाची यासारख्या अनुक्रमे संगणक, संगीत, व्यवस्थापन, विज्ञान,साहित्य, अर्थशास्त्र, तंत्रज्ञान या विषयांवर लेखन केलेल्या या लेखकाची अतिशय सोप्या भाषेतली रंजक तरीही अत्यंत मौलिक माहिती आपल्यापर्यंत पोहोचली आहेच. फक्त लेखक म्हणूनच नाही तर संगणकतज्ज्ञ, व्यवस्थापनतज्ज्ञ म्हणून ज्यांचा अनुभव सॉफ्टवेअरच्या क्षेत्रात २५ वर्ष असा झाला आहे की त्यांच्या सॉफ्टवेअर एक्स्पोर्टमधील सर्वोत्कृष्ट कामगिरीसाठी पंतप्रधांनांनी त्यांना दोन वेळा पुरस्कार देऊन गौरवलं. आयआयटीकडूनडिस्टिंग्विश्ड अॅल्‍युमिनसपुरस्कार त्यांना मिळाला. हा पुरस्कार आतापर्यंत आयआयटीतून उत्तीर्ण झालेल्या हजारो विद्यार्थ्यांपैकी फक्त ७-८ जणांनाच दरवर्षी दिला जातो. व्यवसाय, लेखन, संगीत, सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल अच्‍युत गोडबोलेंना आजपर्यंत उद्योगरत्न, सह्याद्री नवरत्न, महाराष्ट्र शासनाचा दोनदा साहित्य पुरस्कार, कुमार गंधर्व पुरस्कार यासारखे अनेक मानाचे पुरस्कार मिळाले आहेतच. अशा या चतुरस्त्र व्यक्तिमत्वाची प्रत्येक क्षेत्रातील भटकंती अभूतपूर्व आहेच.

मध्यंतरी टीव्हीवरदावतया कार्यक्रमात अभिनेत्री मृणाल कुलकर्णीसोबत अच्‍युत गोडबोलेंना बघितलं. तेंव्हा ते म्हणाले,‘‘मी उपमा खूप छान करतो.म्हणजे कालिदासानंतर मीच, किंवा किंबहुना माझ्यानंतर कालिदास! आणि समजा तुझ्या घरी कधी मी तो बनवला आणि तू समजा तिस-या चवथ्या मजल्यावर रहाते आहेस तर पंचाईत. कारण तुझ्या दाराबाहेर उपम्याच्या दरवळणा-या वासामुळे जमलेले शेजारी, ‘बस्स, आता काय राहिलं आयुष्यात?’ असं वाटून पूर्ण समाधानामुळे किंवा अरेरे! असा उपमा न खाल्ल्यानं आयुष्यातली इतकी वर्ष वाया गेलीअसं वाटून पूर्ण दुःखामुळे या चक्क वरनं उड्या मारुन जीव द्यायचे! इतर कोणी असं धाडसी विधान केलं असतं तर मी कदाचित मी शंका-कुशंका घेत त्या व्यक्तीकडे बघितलं असतं. परंतु प्रत्येक क्षेत्रातली अच्‍युत गोडबोलेंची मास्टरी बघता मीच काय इतरही कोणी अशी स्वप्नातही शंका घेण्याचं धाडस करणार नाहीच.

त्यांच्या खाद्यक्षेत्रातील भटकंतीविषयी जाणून घेण्यासाठी मी त्यांची भेट घेतली आणि काही वेळात सार्या जगाचीच सैर करायला मिळाली. वडापावच्या गाडीपासून ते पंचतारांकित हॉटेलपर्यंतचे जेंव्हा अनुभव ऐकत गेले तेंव्हा अवाक् व्हायला झालं ते वेगळंच.

अच्‍युत गोडबोले यांनी आपल्या कामानिमित्त शेकडो वेळा अनेक देशांतून प्रवास केलाय. तिथले पदार्थ चाखलेत. त्यांच्या या मुशाफिरीबाबत मला उत्सुकता निर्माण झाली आणि ते सांगू लागले-त्यांच्याच शब्दांत ऐकू या.

इंग्लंडमध्ये इंडियन फूड फारच चांगलं मिळतं. साऊथ हॉलमध्ये पंजाबी प्रकारचं तर, वेम्बलीमध्ये गुजराथी प्रकारचं चांगलं खायला मिळतं. सेंट्रल लंडनमध्ये इंडियन फूड अनेक ठिकाणी मिळतं म्हणजे अनेक कानाकोप-यातही हाऊन्स्लोमध्ये एके ठिकाणी मी तिथला कडक नान खायला जायचो. तो इतका अफलातून असायचा. मी त्यावेळी जरा जास्त तिखट खात असे. मग त्या मेनू मध्येव्हिंडालूनावाचा एक पदार्थ मिळायचा. तो म्हणजे आपल्या कोल्हापुरीसारखा. मग मी व्हेज व्हिंडालू आणि नान मागवायचो आणि ते खायला मजा येत असे.

एकदा इटलीमध्ये ट्युरिनो या ठिकाणी मी गेलो होतो. फियाट कंपनीत काहीसं काम होतं. त्या जेवणातल्या पदार्थांची संख्याच बघून मला बेशुध्द पडायला झालं! जेवणाआधी पंधरा-वीस प्रकारचे स्टार्टर्स आले. अनेक प्रकारचे हर्बज घातलेले, गार्लिक आणि तत्सम गोष्टींपासून बनवलेले वेगवेगळ्या फ्लेवर्समधले स्टार्टर्स येत होते. इटालियन स्टार्टर्स हे अतिशय सुंदर असतात. त्यानंतर वेगवेगळ्या तर्हेचा पाश्ता आणि वेगवेगळया चवीच्या गोष्टी येत होत्या. हे सर्व झाल्यानंतर जेव्हा त्यांनीमेन कोर्स काय पाहिजे?’ असं विचारताच आम्ही पार आडवेच झालो. मी मीटिंगनिमित्त तिथेच राहिलो होतो. मला आठवतंय की ट्युरिनोमध्ये जेवल्यानंतर हॉटेलमधल्या खोलीमध्ये गेल्यावर रात्री दोन वाजता काही तरी एकदम गदागदा हलायला लागलं होतं. खोलीतल्या वस्तू घरंगळायला लागल्या. मला काहीच कळेना. जेवणात काही भांग वगैरेसारखे तत्सम पदार्थ तर नव्हते ना असंही वाटून गेलं. मी हॉटेलच्या लॉबीमध्ये आलो. माझ्याआधी सगळेच तिथं जमलेले दिसले, नंतर कळालं की तिथे नुकताच भूकंप झाला होता. इटली मध्ये सतत भूकंप होतात. ट्युरिनो तर त्यासाठी (कु) प्रसिध्द आहे. आज ती काही मीनिटं आठवूनही अंगावर शहारे येतात!

तसंच, ग्रीसमध्ये आणि लेबॅनान आणि सगळ्याच मध्यपूर्वेत पीटाब्रेड आणि फेलाफेल अशा त-हेच्या गोष्टी मिळतात. भारतातला पराठा, अफगणिस्तानात नान, ग्रीस आणि युरोपमध्ये पीटाब्रेड, इटलीतला पिझ्झा हे सगळे एकाच गोष्टीचे वेगवेगळे अविष्कार. पण युरोपच्या मुख्य भागात गेलं की हे प्रकार बंद होतात. युरोपियनांच्या खाण्यात हे प्रकार मुख्य पदार्थ म्हणून येत नाहीत. खाण्याच्या पदार्थात जसं किनारपट्टीत नारळ आणि भात जास्त प्रमाणात मिळतो तसा नान हा प्रकार भारत, अफगणिस्तान, पाकिस्तानमध्ये, मध्येपूर्वेमध्ये अगदी दक्षिण युरोपपर्यंत मिळतो. नानसारख्या पिटाब्रेडमध्ये सॅलड भरलेलं असतं. फेलाफेल देखील वेगवेगळ्या त-हेचं नॉनव्हेज किंवा व्हेज असं मिळतं. फेलाफेल हे भज्यासारखं क्रिस्पी असतं. त्यात वेगवेगळ्या भाज्या वापरलेल्या असतात. मला आठवतंय अमेरिकेत बॉस्टनजवळ केंब्रिजमध्ये एमआयटीसमोर माझं ऑफीस होतं. केंब्रिजमध्ये एमआयटी आणि हार्वर्ड विद्यापीठं आहेतं. एमआयटीसमोर चक्क एक गाडी उभी असायची. अमेरिकेत रस्त्यावर उभ्या असणा-या गाड्या कधी दिसल्या नव्हत्या. त्या गाडीवर तिथं मिडल इर्स्टन बर्याच गोष्टी मिळायच्या. तिथं फेलाफेल मिळायचं. ते फारच रुचकर आणि स्वादिष्ट असायचं. मी अनेकदा ते खायचो.

अमेरिकेमध्ये पिझ्झा खाण्यात एक वेगळीच मजा आहे. हावर्ड स्क्वेअरला बार्टुची किंवा तत्सम नावाच्या हॉटेलमध्ये बॉस्टनला मी पिझ्झा खायचो. अमेरिकेत पिझ्झा वेगवेगळया त-हेचे मिळतात. त्यांची प्रसिध्द चेन आहे. तिथं थिन अँड क्रिस्पी असा सुंदर पिझ्झा मिळायचा. तिथं नेहमी तुम्हालापिझ्झा जाड हवा की थिन अँड क्रिस्पी हवाअसं सर्वसाधारणपणे विचारतात. थिन अँड क्रिस्पी पिझ्झा खायचा मला कळलं सिसिलीपासून साठ किमी अंतरावर एक माल्टा नावाचा छोटासा युरोपमधला देश आहे तिथं. मी ऑफीसच्या कामासाठी तिथं गेलो होतो. सुंदर आणि स्वच्छ असा समुद्रकिनारा. साधारणपणे आपल्या गोव्याची आठवण यावी असं ते ठिकाण..मला खूप आवडलं होतं ते ठिकाण. तिथं मी थिन अँड क्रिस्पी पिझ्झा प्रथम खाल्ला. तिथनं मला त्याची आवड लागली. पण मला मात्र पिझ्झा हटचा थिक म्हणजे जाड पिझ्झा जास्त आवडतो.

न्यूयॉर्कच्या क्वीन्समधल्याफेमस पिझ्झासारखा मात्र मी अजूनही पिझ्झा खाल्ला नाहीये. तिथे गल्लोगल्ली पिझ्झासाठी चिक्कार दुकानं आहेत. लोक असे लंच टाईमला भराभरा येतात, पिझ्झाचा तुकडा आणि कोक घेतात. भट्टीत सारखं पिझ्झा करणं चालू असतं. आपल्याकडे इटालियन म्हटलं की साधारणपणे पिझ्झा आपल्या डोळयासमोर येतो. म्हणजे भारतात पाहुण्यांना पिझ्झा नेणं हे आपण त्यांची सरबराई केल्यासारखं मानतो. पण अमेरिकेत पिझ्झा खाणं म्हणजे जंकफूड समजलं जातं. पोरं ते खातात. किंवा ऑफीसमधले लोक घाई असेल किंवा ऑफीसमध्येच मीटिंग वगैरे चालू असताना खात खात काम करायचं असेल तर पिझ्झा मागवतात. पाहुण्यांना खास काही खाऊ घालायचं असेल तर मात्र अमेरिकन लोक छानशा इटालियन हॉटेलमध्ये पाहुणचारासाठी त्यांना घेऊन जातात. तिथं वेगवेगळ्या प्रकारचे पाश्ते, सूप्स मिळतात. मॅनहटनमध्ये वातावरण खूपच छान आणि मजेशीर असतं. रस्त्यावर हॉट डॉग करणारे आरडाओरडा करुन विकताहेत. ‘‘या या या, आमच्या हॉटडॉग कसा छान आहे’’ असं सांगताहेत, लोक घोळक्यानं जमून गप्पा विनोद करत खाताहेत. रस्त्यावर लोकं पुस्तकं विकताहेत. अनेक देशातली वेगवेगळ्या प्रकारची, कल्चरची दुकानं. आफ्रिकेतल्या सीडीज, रेकॉर्डस, अँटिक्सची, निरनिराळी दुकानं. शेकडो देशातली अनेक दुकानं.खाण्याची दुकानंही चिकार. कोप-याकोप-यावर भारतीय, इटालियन, मेक्सिकन, थाई रेस्टारंट आहेत. तिथं खूपच ग्रेट वाटतं. मी अनेक विकएन्डज मॅनहटनमध्येपडीतअसायचो. दर वेळी काहीतरी वेगळं शोधून काढून खायचो. एकंदरीत मॅनहटनमध्ये खूप गंमत गंमत आहे. तसंच तिथल्याव्हिलेजमध्येही!

अमेरिकेत एक चिचिज हॉटेल आहे. त्या हॉटेलची चेनच आहे. वॉशिग्टंनमध्ये आणि अनेक ठिकाणी आहे. तिथंमार्गारिटानावाचं एक ड्रिंक मिळायचं. ग्लासमध्ये ड्रिंक असायचं आणि ग्लासच्या तोंडाशी कडेला मीठ लावलेलं असायचं. तो एक गे्रेट प्रकार होता.

थायलंडमध्ये सुध्दा जेवढं चांगलं थाई फूड मिळत नसेल तितकं इंटरेस्टिंग थाई फूड इथं मॅनहटनमध्ये अनेक ठिकाणी मिळतं. तिथे मेक्सिकन, इटालियन फूड मला पहिल्यांदा खायचं कळालं. थाई फूडमध्ये पाईनॅपल घालून केलेला फ्राईड राईस इंटरेस्टिंग असतो. त्यांच्या करीज फार प्रसिध्द असतात. त्यात हिरव्या मिरच्या घालून केलेली ग्रीन करी आणि लाल मिरच्या घालून केलेली रेड करी खूपच प्रसिध्द आहे. या बहुतांशी करीज नारळाच्या दुधात करतात. या करीमध्ये मशरुम, ब्रॉकोली, बेबीकॉर्न आणि सिमला मिरचीचे तुकडे टाकलेले असतात. आपल्याकडे सिमला मिरची जशी हिरवी असते तशी त्यांची पिवळी किंवा लालही असते. तिचे तुकडे करुन त्यात टाकतात. त्या कोकोनट करीची चव अप्रतिम असते. बॉस्टनमध्ये मी जेंव्हा थाई फूड खाल्लं तेंव्हा ते खूप गंमतशीर वाटलं. यातले सॉस चायनिजपेक्षा वेगळे सॉसेस यात असतात...चायनीजमध्ये जसे टिपीकल चिली सॉस, सोया सॉस. व्हिेनेगार घातलेले असतात तसं थाईफूडमध्ये बनवलेल्या सगळ्या पदार्थांमध्ये दाण्याचं कूट असतं. खूप कॅलरीज असलेले हे पदार्थ असतात. पीनट सॉसमध्ये असलेल्या अनेक पॅक गोष्टी यात असतात. पण थाई फूड खाणं म्हणजे एक सुंदर अनुभव आहे!

मला आठवतं, फ्रान्समध्ये एक रेस्टारंट आहे. तिथला कुक म्हणे, खूपच लहरी आहे. तो त्याचा त्या दिवशी जो मूड असेल ती भाजी घेऊन येतो. आणि त्या दिवशी त्याच्या रेस्टारंटमध्ये तीच भाजी किंवा त्याच्या मूडप्रमाणे मेनू तयार होतो. तुमची ऑर्डर किंवा इच्छा काहीही असो त्यानं बनवलेलंच तुम्हाला मिळतं. (खावं लागतं) तसंच तो सॉस, चटण्या, लोणची असं काहीही ठेवत नाही, देतही नाही. ज्याअर्थी तुम्ही सॉस टाकताय याचा अर्थच असा की मूळ पदार्थात काहीतरी कमी आहे अशी त्याची विचित्र थिअरी होती. त्याच्या म्हणण्याप्रमाणे बनवलेलं फूड इतकं चविष्ट असायला हवं की या बाकी सॉस वगैरंची गरजच भासायला नको. म्हणजे कुठलाही सॉस करुन घालावा लागणं हा अन्नाचा चक्क अपमान आहे! त्याचा हा आत्मविश्‍वास जबरदस्तच आहे. आणि अर्थातच फूडही. त्याच्या या जेवणाची चव घेण्यासाठी जगभरातून लोक दोन दोन वर्षापासून क्‍यू लाऊन वाट बघत असतात. एक दंतकथा अशीही सांगितली जाते की एकदा इंग्लडच्या राणीचा दौरा फ्रान्सकडे आपल्या ४० जणांच्या लवाजम्यासह असताना तिनं या कुकला आपल्या तिथल्या निवासस्थानी बोलावण्याची इच्छा प्रदर्शित केली. कुकला बोलावलं गेलं तेंव्हा त्यानं नम्रपणे नकार दिला आणि राणीनं खायचं असेल तर आपल्या रेस्टारंटमध्येच यावं असं सुनावलं. आश्चर्य असं की राणीनं न रागावता त्याच्याकडे गेली आणि निमूटपणे त्यानं जे बनवलंय ते आनंदात खाल्लं. मी या कुकबद्दल खूप ऐकलं होतं, मात्र मला त्याच्या हातचा खाण्याचा योग आला नाही ही खंत अजूनही आहेच.

ऑस्ट्रेलियामध्ये मी जेव्हा गेलो तेव्हा फूड कोर्ट हा प्रकार पहिल्यांदा मला बघायला मिळाला. आता आपल्याकडेही अनेक ठिकाणी अशा प्रकारची बरीच कोर्टस् निघाली आहेत. ऑस्ट्रेलियातल्या सिडनीतल्यालोकलगाड्या मुंबईसारख्याच आहेत. इथे जशी दादर, बांद्रा, अंधेरी अशी जलद लोकल्सही थांबतील अशी मोठी रेल्वे स्टेशन्स आहेत, तशी तिथेही पॅरामाटासारखी स्टेशन्स आहेत. अशा स्टेशन्सवर एक मोठ्ठ गोल वर्तुळाकार कोर्ट असतं आणि सगळे लोक मध्ये कॉमन खुर्च्यात बसलेले असतात. व्हिएटनामी, चायनीज, इंडियन, इंडोनेशियन, मलेशियन, मिडल इर्स्टन, मेक्सिकन, थाई प्रकारची अनेक रेस्टारंटस् त्या ठिकाणी असतात याशिवाय तिथं सँडविच, पिझ्झा असे अनेक प्रकार मिळतात. तिथे कुठलंही आवडेल ते फूड आपण घेऊन यायचं आणि खायचं. तिथं खायला मजा यायची कारण खूप चॉईस असायचा. मी अर्थात ही २० वर्षांपूर्वीची गोष्ट सांगतोय. अलीकडे आपल्याकडे देखील एअरपोर्टला आणि अनेक मॉल्समध्ये फूड कोर्टची अशीच व्यवस्था असते.

एकदा हॉलंडमधून जात होतो. अॅमस्टरडममधे कॅनॉल्स बरेच आहेत. इंग्लडमध्ये जशी भारतीय रेस्टारंट आहेत तशी तिथं इंडोनेशियन आहेत. तिथं इंडोनेशियनफूड खायला मिळालं. इंग्लंडचं जसं भारतावर राज्य होतं तसंच हॉलंडचं इंडोनेशियावर होतं. एकदा अॅमस्टरडॅममध्ये ब्रझिलियन फूड खायला मिळालं. जरासं तिखट असतं पण झकास!

कोरियात सिऑलमध्ये जेव्हा मी गेलो तेव्हा मी रस्त्यावर कुत्रे मारुन त्याचे अवयव विकायला ठेवलेले बघितले. कुत्र्याचे पाय वगैरे. मला ते सगळं बघवेचना. कदाचित ते चांगलंही लागत असेल. मी अलिकडे नॉनव्हेज शक्यतोवर टाळत असल्यामुळे मात्र या पदार्थांपासून बचावलो.

जपानमध्ये मी ऐकलं होतं की तिथं माकडाचा ब्रेन खातात. जिवंत माकडाला टेबलाखाली बसवतात. आपण आपल्याला हवं ते माकड निवडायचं टेबलाला गोल चकतीएवढं भोक असतं. त्याचं डोक तेवढं त्यातून वर येतं. मग सुरी फिरवली की निवडलेलं माकडाचं डोकं सट्वन कापलं जातं. आणि मग स्ट्रॉ लावून आपण नारळाचं पाणी पितो, तसंच काहीसं ते प्यायचं म्हणे. असा हा भयंकर प्रकार अजूनही तिथं आहे असं मी ऐकलंय. जपानमध्ये सुशी बार्स आहेत. या सुशी बार्समध्ये भज्यांसारखे बेचव पदार्थ मिळतात. तिथं मासेदेखील कच्चेच खातात. जपानमध्ये माझे खाण्याचे खूप हाल झाले. तिथं एकूणच शाकाहारी पदार्थ खूप कमी खातात. तिथं नूडल्सची पाकिटं मात्र मिळत आणि करे नावाची काही पॅकेटस मिळत. हिरवट विटकरी काळसर रंगाची त्यात करी असायची. या करीला जरा तरी चव असायची. जपानमध्ये करीनं मला तरलं म्हटलं तरी चालेल! टोकियोतल्या गिंझामध्ये काही भारतीय रेस्टारंट आहेत. तिथं मात्र भारतीय पदार्थ मिळायचे. हॉंगकागमध्येही लोक प्रचंड प्रमाणात मांसाहारीच खातात.

मेक्सिकन आणि चायनिज रेस्टारंटस्मध्येफ्राईड आइस्क्रीमनावाचा धमाल प्रकार होता. आता तो भारतातही काही ठिकाणी मिळतो. आईस्क्रीमच्या वर पीठाचं एकदम गरम आवरण असायचं आणि त्यात थंड आइस्क्रीम. पूर्वी मला हा प्रकार खूपच आवडायचा. अफलातूनच हा प्रकार आहे.

जेवणानंतरचा सगळ्यात कहर गोड डेझर्ट आयटम म्हणजे अत्यंत गरम गुलाबजामवरती व्हॅनिला आइस्क्रीम. म्हणजे ब्रम्हानंदी टाळी! पहिल्यांदा मी ताजमहालच्या नरिमन पॉंईटवरच्या रंगोली रेस्टारंटमध्ये हा पदार्थ खाल्ला आणि त्यानंतर तीन महिने रोज मी फक्त हेच केलं. व्हॅनिला आईस्क्रीमचे डबेच्या डबे फ्रिजमध्ये आणून ठेवले. गुलाबजाम विकत आणायचा. तो पाकामध्ये चांगला उकळून घ्यायचा आणि त्यावर व्हॅनिला आईस्क्रीम टाकायचं बस्स.. अप्रतिम!..हा एवढाच एक शब्द त्यासाठी पुरेसा आहे. माझ्या या प्रयोगांवर अर्थातच घरचे सगळे वैतागले होते. पण मला तर कुठल्याही गरम पदार्थावर आईस्क्रीम घालून खायचा मग नादच लागला. तसंच गरमागरम जिलेबीवर आईस्क्रीम टाकून खाणं हा सुध्दा अफलातून प्रकार आहे. म्हणजे तोडच नाही त्याला. अगदी प्रत्येकानं याप्रकारे आर्वजून खाऊन बघायलाच हवा. अलिकडे चायनिज रेस्टारंटमध्येहनी फ्राईड नुडल्सम्हणजेदारसानहा सुध्दा एक ग्रेट पदार्थ मिळतो. त्यात मधामध्ये फ्लॅट नुडल्स तळून त्यावर व्हॅनिला आइस्क्रीम टाकून ते खातात. प्रचंडच आवडण्यासारखा हा पदार्थ आहे. सांताव्रुझच्याडायनॉस्टिककिंवा साकिनाकाच्यामेन लँड चायनायासारख्या ठिकाणी हादारसानमिळतो.

एकदा मी अमेरिकेत असताना छान पपईची स्लाईस समोर आणली गेली. इथंही कोणत्याही पंचतारांकित हॉटेलमध्ये याप्रकारे सर्व्ह करतात. दीडशे ते दोनशे रुपये फक्त! या पपईसेाबत लिंबाची फोड हेाती. मला कळेचना हे लिंबू कशासाठी म्हणून. पण मी म्हटलं, चला जरा पिळून बघावं. अगदी बारीकसं लिंबू त्या पपईवर पिळलं की येणारी ती चवक्या कहने! लाजवाब!’. त्यानंतर मी पपई खायची असल्यास लिंबू पिळल्याशिवाय खाऊच शकत नाही. प्रत्येकानं या चवीचा मी म्हणतो त्याप्रमाणं अनुभव घेऊन पहावाच पहावा.

ऑस्ट्रेलियात मी पॉलिनेशियन फूड खूप खाल्लं. बर्मीज फूड किंचीत वेगळं असतं. मुंबईत बर्मीज, तिबेटन फूडचं एक जॉंईंट जुहूला निघालं होतं तेंव्हा मी तिथे खाल्लं. जुहूला सीव्हयू हॉटेल जवळच्या कोपर्यावर मी तिबेटन फूड खायचो. मला फार गंमत वाटायची.

मेक्सिकन फूड मध्ये चिली (म्हणजे मिरची नव्हे, किंवा देशही नव्हे) वापरतात. हे बीन्ससारखं असतं. ‘मेक्सिकन राईसहा फ्राईड राईसपेक्षा वेगळा असतो. हा कोरडा कोरडा वाटतो. त्यावर वितळलेलं चीज घालून ते सर्व्ह करतात. अर्थात मेक्सिकन पदार्थ म्हणजे एकदम फॅटी आणि स्पाईसी समजले जातात. मला ते फारसे तसे वाटले नाहीत. खरं तर मला मेक्सिकन पदार्थ फारसे भावले नाहीत.

मेक्सिकन फूडमधली एक गोष्ट मला खूप आवडली, ती म्हणजेएंचिलाडाज्’! भारतातसुध्दाएंचिलाडाज्खूप छान मिळतात. मुंबईत चौपाटीसमोर समुद्रासमोर न्यूयॉर्करमध्येएंचिलाडाज्खूप चांगला मिळायचा पार्ल्याच्या शिवसागरनं हा पदार्थ फार चांगल्या तर्हेनं उचललाय. एंचिलाडाज्मध्ये मैद्याचे रोल केलेले असतात. रोलमध्ये बर्याच गोष्टी असतात. चीज असतं. टोमॅटो ग्रेव्ही/प्युरी असते. मला अमेरिकन कॉर्नचे मऊ सॉफ्ट असलेलेएंचिलाडाज्खूप आवडतात. मेक्सिकन फूडमध्ये मला हा पदार्थ खूपच आवडतो. कॅलिफोर्नियात मेक्सिकन फूड खायला छान मिळतं. कॅलिफोनिर्यात एकदम ओपन छान वातावरण असायचं. मी जेव्हा जायचेा तेंव्हा इन्फर्मेशन टेक्नालॉजीचा बूम होता. हॉटेल्सचीही भरभराटच होत होती. जिकडे तिकडे भारतीय लोक दिसायचे. लोक हसताहेत, गप्पा मारताहेत. अप्रतिम वातावरण! कॅलिफोर्नियातल्या साऊथ इंडियन रेस्टारंटमध्ये वेगवेगळ्या त-हेचे डोसे देखील मिळायचे.

त्यावरुन आठवलं, जुहूलावुडलँडनावाच्या ठिकाणीडोसा फेस्टिव्हलहोतं. इतक्या तर्हेचे डोसे होते. ७५ प्रकारचे डोसे! म्हणजे साधा, म्हैसूर, चॉपसुयी, मसाला, चीज, पालक, पेपर, रवा इत्यादी. तुम्ही ठराविक रक्कम भरुन आत जायचं आणि मग पाहिजे ते उचलायचं आणि कुठल्याही स्टॉलवर जाऊन खायचं.. बंगलोरलाएमटीआरनावाचं अप्रतिम हॉटेल आहे. तिथेही थाळीत ७५ तर्हेचे पदार्थ असतात. सारखे पदार्थ येतच रहातं. काय खावं आणि काय नको असं होतं.

साऊथ इंडियन फूड बाबत मला एक आठवण सांगावी वाटते. मद्रासमध्येअन्नलक्ष्मीनावाचं हॉटेल आहे. मीएल अँड टीमध्ये चीफ एक्झिक्युटिव्ह असताना तिथं गेलो होतो. ‘अन्नलक्ष्मीची सिंगापूरला एक शाखा होती. पॉश एंअरकंडिशन्ड हॉटेल होतं. साध्या वेशातल्या वेटरनं मेनू समोर आणलं. मीही अत्यंत आदबीनं त्याला विचारलं, ‘‘इथं काय चांगलं मिळतं?’’, तोही तितक्याच नम्र स्वरात म्हणाला, ‘‘इथं सगळं छान मिळतं’’. माझ्या चेन्न्ईच्या हेडनं मला मुद्दाम सांगितलं, ‘‘याच्याशी खूप आदबीनं बोल’’. ही काय भानगड आहे मला कळेचना. मी मनात म्हटलं की मी तर नेहमीच आदबीनं बोलतो. कधीही कोणावरही ओरडत नाही. तरीही आपला हेड आपल्याला असं का सांगतोय. तेंव्हा तो म्हणाला, ‘‘हा वेटर म्हणून आलाय तो कोण आहे माहिती आहे का? हा चेन्नईमधला सगळ्यात मोठा न्यूरोसर्जन आहे आणि पलीकडे टेबलवर जो सर्व्ह करतोय तो चेन्नईमधला सगळ्यात मोठा पेड्रियाट्रिशियन..’’. मी तर चाटच पडलो. बाजूच्या वेटरकडे बघून तो म्हणाला, ‘‘हा गायनॅकालॉजिस्ट, हे सगळे चेन्नईमधले सगळे ग्रेट डॉक्टर्स’’. मला काही कळेचना. माझ्या गोधंळलेल्या चेह-याकडे बघून मला माझ्या हेडनं सांगितलं की,‘‘आपल्या मधल्या सुट्टीत याअन्नलक्ष्मीहॉटेलमध्ये येऊन हे सगळे तज्ज्ञ डॉक्टर्स सेवा देतात आणिअन्नलक्ष्मीने चालवलेल्या हॉस्पिटलसाठी या सेवेतनं मिळालेले आपले पैसे हे डॉक्टर्स हॉस्पिटलसाठी देतात’’. सिंगापूरमध्येही अन्नलक्ष्मीची ब्रँच आहे. तिथंही मी गेलोय. खूपच छान आहे. बाहेर छान मोठ्ठी समई ठेवलेली असते. साउथ इंडियन संगीत चालू असतं. प्रत्येकानं तिथं जरुर भेट द्यावी असं हेअन्नलक्ष्मीआहे.

बंगलोरला अमरावती, नागार्जून, आरआर अशी छान रेस्टारंटस् आहेत. तिथे आंध्र पध्दतीचं तिखट जेवण मिळतं. तिथं पदार्थ केळीच्या पानावर वाढतात. इथे खायला झकास मिळायचं. पण इंग्लडच्या कस्टमरला घेऊन मी तिथं जेव्हा गेलो, त्याच्या डोळ्यातून पाणीच आलं होतं. नंतर मात्र तो आंध्र फूड म्हटलं की तिखटाच्या आठवणीनं नको म्हणायचा. पण मला मात्र ते फारच आवडायचं.

एकदा म्हैसूरमध्ये मी गेलो असताना तिथं एके ठिकाणीबटर इडलीखाल्ली होती. बटर खूप टाकलं म्हणून ती इडली छान लागते असं नव्हे तर तिची बनवण्याची पध्दत इतकी अफलातून होती. त्यांचा सांबार, त्याची चव आणि वेगवेगळ्या तर्हेनं बनवलेल्या चटण्या, रस्सम, अतिशय सुंदर. मुंबई-पुण्याला जी ठराविक चटणी मिळते त्यापेक्षा या ठिकाणी खूप वेगवेगळ्या चटण्या तिथे होत्या. तिथली इडली ही खूपच लुसलुशीत होती. माझी एक थिअरी आहे की जितकं कळकट आणि गचाळ ठिकाण तितकं तिथले पदार्थ अप्रतिम आणि रुचकर! दादर स्टेशनवरुन तुम्ही जर माटुंग्यावरुन माहिमकडे निघालात, तर धारावीच्या अगोदर एक रस्त्यावरच हॉटेल आहे. पाचपन्नास लोक तिथं दान मागायला उभे असावेत अशी गर्दी करुन उभे असतात. बारा ते पंधरा रुपयाला वडा आणि अनेक अप्रतिम पदार्थ! सगळेच पदार्थ तिथे इतके स्वस्त आणि फ्रेश मिळतात की काही विचारुच नका! तसंच मुंबईत कुठल्याही साध्या गाडीवर म्हैसूर साधा डोसा मागावा. बीट, गाजर, कोबी आणि चटण्या वगैरे टाकून केलेला हा म्हैसूर डोसा म्हणजे एकदम अप्रतिम, ग्रेटच!

अनेक वर्षांपूर्वी एकदा कामानिमित्त दिल्लीच्या अकबर हॉटेलमध्ये उतरलो होतो. १९८०चं ते दशक असावं. मला फाइ्रव्ह स्टार हॉटेल्स जेवणासाठी कधीही फारसे आवडत नाहीत. मात्र दिल्ल्लीत अनेक ढाबे इतके सुंदर आहेत की तोबा! तिथल्या एका साध्याशा ढाब्यावर मी पराठा, डाल फ्राय आणि लस्सी मागवली होती. सगळे मिळून त्याकाळी १५ ते २० रुपये झाले होते! बिल देताना त्यानं बसच्या तिकीटाच्या मागं काही आकडे लिहून दिले होते असलं बिल मला कंपनीला सादर करण्यासाठी चालणारं नव्हतं. पण ते जेवण मात्र अतिशय सुंदर होतं. तसंच मुंबईत मीसीप्झमध्ये असताना मरोललाउत्तमदा ढाबाम्हणून एक ढाबा शोधून काढला होता. सर्वप्रथम मी तिथे गेलो तेव्हा तिथे पूर्ण शुकशुकाट होता. पण नंतर मी अनेक मित्रांना तिथे नेऊन त्याची लोकप्रियता वाढवली. तिथं खाटा टाकलेलं वातावरण असायचं. आणि अप्रतिम फूड. नंतर ते इतकं प्रसिध्द झालं की लोक रांगा करुन जेवणासाठी अक्षरशः वाट बघायला लागले!

तसंच अहमदाबादजवळविशालानावाचं जॉंईट आहे. प्रत्येकानं तिथें गेलंच पाहिजे कारण ते इतक्या मोठया, प्रचंड जागेवर पसरलेलं आहे. तिथं गेल्यावर आत फिरायला गाड्यांची व्यवस्था केलेली आहे. या गाड्यांनी आपल्याला एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी जाता येतं. तिथं हवं तिथे तुम्हाला फिरता येतं. त्या परिसरात अनेक झोपाळे आहेत. जागोजागी विदुषक असतात, जादूगार जादू करत असतात आणि अशा चिकार गंमतीजमती तिथं चाललेल्या असतात. अनेक ठिकाणी विखुरलेल्या वेगवेगळ्या स्टॉल्सवर असंख्य तर्हेचे पदार्थ बनवलेले असतात. तिथे लोकगीतांचं अनोखं वातावरण असतं. कुठेही जा, कितीही खा आणि संगीताचा मनसोक्त आस्वाद घ्या!

ठाण्याला एक असं ठिकाण झालंय, जिथं तुम्ही फिरायचं, खायचं आणि जितका वेळ वाटेल तितका वेळ थांबायचं. वरळीलामेलानावाचं एक ठिकाण आहे. पार्टी करायची असल्यास तिथे आवर्जून करावी. शूच्या नालेसारख U आकाराचं ठिकाण तिथे आहे.त्या कडेला माणसांनी बसायचं. साधारणपणे सगळे पदार्थ तंदुरी असतात. तंदुरीसाठी ते प्रसिध्द आहे. तिथं मोठ्ठी भटटी लावलेली असते. फिश पनीर, चिकन फ्रायपासून प्रचंड मोठया संख्येनं पदार्थ येत असतात. अक्षरशः डझनावारी स्टार्टर्स येतात. पनीर येतात, मशरुम येतात आणि असे पदार्थ येतच राहतात. शेवटी पराठा, डाल, नान आणि नंतर परोठा नंतर कुल्फी. तिथं कोणी गाणी वाजवणारा असतो, तर कोणी नकला करणारा, एकूणच पिकनिकचं वातावरण तिथं असतं. ठाण्याला सर्कलपाशी हायवेजवळ जो मॉल आहे तिथं पहिल्या मजल्यावरव्हिलेजनावाचं ठिकाण आहे. तिथंही असंच जादू वगैरेचे प्रयोग चालू असतात. तिथेही जेवणासाठी बफेचे अनेक स्टॉल्स असतात. त्यात महाराष्ट्रीयन, चायनिज पदार्थ मिळतात. तिथं आत गेल्यावर तुमच्या हातावर खूण केली जाते. (निवडणुकीच्या चिन्हासारखं हे गंमतशीर वाटतं. पैसे भरल्याची खूण म्हणून ती असते) बारा ते तीनपर्यंत तुम्ही कितीही वेळा खाल्लं आणि बाहेर जाऊन पुन्हा कितीदाही आत आलात तरी चालतं!

मुंबईत अंधेरी कोलडोंगरीमध्येजनतानावाचं एक ठिकाण आहे. तिथं सामोसे मिळतात. तिथंमला, मलाकरुन लोक गर्दी करुन उभे असतात. ‘‘माझ्या वाट्याला सामोसा कधी येईल?’’ म्हणून पैसे घेऊन आशाळभूतपणे उभे असतात. इतकं सुंदर वाटतं हा सामोसा खाताना. पार्ल्याला (पार्ले ईस्टला) ‘के. के. पंजाबहे एक असंच छानसं ठिकाण आहे. इथं मागवायचंटोमॅटो फ्राय आणि बटर रोटी’. गेली पंचवीस वर्ष मी त्याच्याकडे गेलो की फक्त हाच पदार्थ मागवतो. एकदा मालकानं,‘‘दुसरंही काही टेस्ट करुन बघा ना’’ असं म्हणताच मी म्हणालो, ‘‘बाबारे, गेली पंचवीस वर्ष हा टोमॅटो फ्राय खाऊन अद्याप माझं मन भरलं नाही, तर मी दुसरं काही मागवू कसं?’’ त्या टोमॅटो फ्रायची चव बदलत नाही - तीच चव. त्याच्या स्पेशल तव्याचा परिणाम असतो, की आणखी काय कुणास ठाऊक! खरं तर कसलाही मसाला त्यात वापरलेला नसतो. पण ग्रेट चव. एकदा तर मी कौतुकानं माझ्या काही मित्रमंडळींना के.के.मध्ये घेऊन गेलो आणि टोमॅटो फ्रायची ऑर्डर देताच तो म्हणाला,‘‘ आज दुसरं काहीही मागा. आज टोमॅटोच नाहीत’’. पण त्या टोमॅटो फ्रायची चव खाण्यापूर्वीच माझ्या जीभेवर रेंगाळत होती. आता माघार घेणं शक्यच नव्हतं. मित्रांना तिथंच बसवून मी सरळ जवळचीच मंडई गाठली. दोन-चार किलो टोमॅटो विकत घेतले. हॉटेलमालकाच्या पुढ्यात आणून टाकले आणि म्हटलं ‘‘आता आधी कर’’. तो हॉटेलमालक, वेटर आणि मित्र सगळेच माझ्याकडे बघत राहिले. मी मात्र बटर रोटी आणि टोमॅटो फ्राय समोर येताच शांत झालो हे सांगायला नकोच.

पार्ल्याच्या शिवसागरमधली इडली, इतकी सॉफ्ट आणि सुंदर असते! तसंच इतला पनीर रवा डोसाही ग्रेट असतो. अतिशय झकास फ्रूटसॅलेड, अप्रतिम कॅरेट आणि टोमॅटो ज्यूस या ठिकाणी मिळतो. शिवसागरनं एक्सलन्सचा जो ध्यास आहे त्यासाठीक्या कहने!’ मुंबईला लिमयांचं जिप्सी आहे. तसंच पूर्वी वरसोळ्याला सिग्नेचर हॉटेल होतं. तिथं सचिनपासून लता मंगेशकरांच्या सिग्नेचर्स बोर्डवर लावलेल्या असत. तर या सिग्नेचर हॉटेलमध्येस्टफ पनीर चिलीहा पदार्थ आणिस्टीम वॉन्टनखायचा. याच्यासोबत बारीक ग्रेव्ही येते. हिरव्या रंगाचा सॉस येतो. हा पदार्थ अप्रतिम आणि अतिशय सुंदर लागतो, ‘स्टफ पनीर चिलीचेही तसंच. तोही अत्यंत क्लास! त्याचं ते क्रिस्पी आवरण. बिया काढलेल्या मिरच्या (फार तिखट लागू नयेत म्हणून). हा पदार्थ खाल्ला पाहिजेच पाहिजे!

महाराष्ट्रीयन पदार्थांमध्ये पार्ल्याला पूर्वेला साठे कॉलेजच्या मागे, गार्डनजवळस्वादिष्ट रुचकरनावाचं छोटसं टपरीवजा ठिकाण आहे. रस्त्यावरच उभं राहून तुम्हाला खावं लागतं. तिथे साबुदाणाची खिचडी, साबुदाण्याचा वडा आणि इतर पदार्थ अप्रतिम मिळतात. त्यात थोडं ताक घातलेलं असतं. मला ते फार आवडतं. तसंच दादरला प्रकाशामध्ये साबुदाणा वडा आणि खोब-याची वडी खावी. अशी वडी कुठेही खायला मिळणार नाही याची हमी. प्रकाशाच्या थोडं पुढं दत्तात्रयमध्ये महाराष्ट्रीयन थाळी खावी. आयआयटीच्या दिवसात अनेक वेळा मी ही थाळी खाल्लीय. साधारपणतः महाराष्ट्रीयन आमटी म्हटलं की डाळ ही भिंग घेऊनच बघावी लागते. तिथं मात्र जी आमटी मिळते ती इतकी चवीला छान असते की खातच रहावं वाटते.

१९७०च्या दशकात मी तेव्ंहा आयबीएममध्ये होतो. तेंव्हा पावभाजी पहिल्यांदा मुंबईला ताडदेवला सरदार इथं आणि नंतर व्हीटीला सुरु झाली. त्यानंतर मिलीटरीच्या लोकांनी पावभाजीचा स्टॉल टाकला होता. त्यानंतर मात्र गल्लोगल्ली पावभाजीच्या गाड्या दिसायला लागल्या. सरदारमध्ये जी पावभाजी मिळायची लोक त्यासाठी क्यू करुन उभं रहायचे. मुंबईत फोरासरोड, जो रेड लाईट एरिया म्हणून ओळखला जातो, तिथं नॉनव्हेजसाठीदिल्ली दरबारफारच प्रसिध्द होतं. लोक क्यू करुन उभे असत. कोणत्याही मुस्लिम रेस्टारंटमध्ये सहसाचिकन व्हाईटअतिशय उत्तम मिळतं. मी व्हेज व्हाईट ग्रेव्हीचा आग्रह धरायचो आणि मला ती स्पेशली करुन मिळायची देखील. आणि चवीलाही ती तितकीच गे्रेट असायची. त्याचप्रमाणे मुंबईच्या कुठल्याही इराणी हॉटेलमध्ये जा. तिथं ज्याला बु्रन म्हणतात ते मागवायचे. हे ब्रुन कडक पाव मध्ये कापून बटर घालून बनवतात. ते मग चहामध्ये बुडवून खायचं! फौटंनवरच्या इराण्याकडे केक उत्तम मिळतात आणि अंधेरीला स्टेशनवर जो इराणी आहे त्या ठिकाणी हे सारंच खाल्लं पाहिजे.

यावरुन एक ज्योक आठवला. एकदा फौंटनला मी माझ्या मित्राबरोबर चाललो असताना एक इराणी हॉटेल दिसलं. तिथे चहा घ्यायला म्हणून आत जायला निघालो. जातानाच गल्ल्यावर बसलेला हॉटेलमालक नाकात बोट घालून नाक कुरतडताना दिसला. माझा मित्र जरा वात्रटच होता. तो म्हणाला,‘जरा गंमत बघ’. तो त्या गल्ल्यापाशी उभा राहून आत सगळयांना ऐकू जाईल अशा तर्हेनं जोरात ओरडला,‘नाकात बो...घालायचं...’ त्यावेळी हॉटेलमालकानंनाहीअसं म्हणत ते वाक्य पूर्ण केलं आणि आपलं बोट नाकातून चटकन काढून घेतलं. मला त्यावेळी फारच गंमत वाटली. खरं पाहिलं तर हॉटेल त्याच्या मालकीचं, नाकही त्याचंच आणि बोटंही त्याचचं. आम्ही कोण होतो, हे बाहेरुन येऊन सांगणारे? मग आम्ही तेवढंच बोलून तिथून सटकलो होतो. त्यादिवशी तिथं पाणी कम चहा मात्र घ्यायचा राहिला. तो तिथं छान मिळायचा.

ठाण्याला मामलेदारामसमोरची मिसळ आणि राममारुती रोडला राजमाताचा वडा मिळतो. हा वडा अप्रतिम असा असतो. वड्यासाठी लोकांच्या तिकिटासाठी लावाव्या तशा रांगाच्या रांगा लागलेल्या असतात. संध्याकाळी अफाट गर्दी तिथं असते. त्याचप्रमाणे ठाण्यालान्‍यू इंग्लिश स्कूलजवळ एकटेम्प्टेशननावाचं ठिकाण आहे. तिथं लिंबू, आलं, कारली, मिरची यांचं आईस्क्रीम मिळतं. त्यातल्या अनेकांच्या चवी ग्रेटच असतात.

तसंच ठाण्याला गावदेवीजवळजोगदेवचं पॉटच आईस्क्रीम मिळतं. पावसाळा नसेल त्यावेळी ते सायंकाळी साडेपाच ते सहाला सुरु होतं. हातगाडीवर घालून अनेक पॉट्समधनं ते अगदी लहानश्या जागेत (6x6) ते येतं. गुलकंद, पिस्ता आणि मँगो या तीन चवींमध्ये ते मिळतं. रात्री आठ ते साडेआठला ते संपतं देखील. मी कधी चुकून चार-साडेचारला ठाण्यात पोहोचलो तर मात्र गोल गोल चकरा मारत या आईस्क्रीमची वाट बघत असतो. इथं पिस्ता आईस्क्रीम इतकं जबरदस्त मिळतं की जीभेवर ठेवताच गार होत आतं कसं विरघळतं जातं पत्ताच लागत नाही. ते इतकं सुंदर लागतं की अनेक ग्राहकांना कधी कधी आईस्क्रीम वेळेआधीच संपल्यामुळे तसंच माघारी परतावं लागतं. मी देखील काही वेळावजन वाढेल का? इतकं आईस्क्रीम खाणं चांगलं का?’ असे उपद्रवी विचार गुंडाळून ठेवून मस्त दोन दोन कप घेऊन ताव मारतो.

तसंच जेवणात मला गुजराथी थाळ्या फार आवडतात. पूर्वी मुंबईत त्या फार मिळायच्या. फटाफट थाळ्या वाढणा-यांचं कसब बघून मी थक्क होत असे. नंतर मला कळालं की ही त्यांची घाई म्हणजे फास्ट बिझिनेससाठी होती. ‘जितकी जास्त माणसं तितका जास्त बिझिनेस’. त्यामुळे पटापट सर्व्हिस देणं, त्याच टेबलचा वापर करुन जितक्या जास्त माणसांना आपण खिलवू शकू तितका बिझिनेस जास्त ही त्यांची थिअरी असावी. आता मुंबईत मरीन लाईन्स, फौंटनला चारपाच ठिकाणी या गुजराथी थाळ्या चांगल्या मिळतात. मुंबईतली महाराष्ट्रीयन थाळ्यांची पध्दत जवळ जवळ गेलीय. पूर्वी गिरगावात वीरकर, दादरला दत्तात्रय अशा ठिकाणी त्या मिळायच्या. पुण्यात मात्र महाराष्ट्रीयन प्रकारचं जेवण अनेक ठिकाणी चांगलं मिळतं. आशा डायनिंग हॉलमध्ये आणि श्रेयसमध्ये मिळणा-या थाळया मला खूप आवडतात. तसंच अलीकडे पुण्यात दोन ठिकाणीपोटोबानावाचं एक सुंदर ठिकाण झालंय. तिथेही पोळीभाजी सुंदर मिळते.

पुण्याला डेक्कन जीमखान्यापाशीअप्पाची खिचडीमिळते. तिथे वातावरण बघितलं तर आपण चाटच पडू. वर पंखा कुरकुरतोय, टेबल हलतंय असंच सगळं. तिथं खिका मागायचा. खिका म्हणजे गरम खिचडी आणि एकदम थंड काकडी. अतिशय सुंदर प्रकार आहे. खरं तर ते ठिकाण म्हणजे टूरिस्ट आकर्षण झालंय. प्रत्येकानं एकदा तरी ही खिचडी खाऊनच बघायला पाहिजे. तिथं डोसाही चांगला मिळतो. फर्ग्युसन रोडवरच्या वाडेश्‍वरमधला सेट डोसाही मस्तच! बाहेर कुठंही मिळत नाही असा एक वेगळाच डोसा इथं मिळतो. त्याचं नावपेसरटू डोसा’. तो मुगापासून बनवलेला असतो. त्यामध्ये वेगळ्या त-हेची चटणी आणि कांदा टाकलेला असतो. अर्थातचपेसरटू डोसाचवीला झकास लागतो!

पुण्यात कँपमध्ये एक पारश्याचं दुकान आहे. त्याच्याकडे चटणी सँडविच अफलातून मिळतं. त्यातल्या चटणीची चव अप्रतिमच असते. ती खाल्ल्याशिवाय मरु नये इतकी अफाट. मी आठ आठ बारा बारा सँडविच बांधून मुंबईला जाताना सोबत नेतो.

नुकताच पुलोत्सव कार्यक्रमासाठी मी रत्नागिरीला गेलो होतो. त्यासाठी मडगाव मुंबई या ट्रेननं प्रवास केला. आपण भारतीय ट्रेनमध्ये आहोत की दुस़र्या देशातल्या ट्रेनमध्ये आहोत हेच क्षणभर मला कळेनासं झालं होतं. ट्रेनमधले सर्व्हिस देणारे स्वच्छ निळ्या गणवेशातले होते. हसतमुख आणि चटपटीत काम करणारा उत्साही पोरांचा स्टाफ होता. इतके पदार्थ एकामागून एक येत होते की तोंडाला पाणी सुटावं. स्वच्छताही तितकीच. छानशा स्टीलच्या डब्यात घालून हे पदार्थ समोर येत. उपमा, शिरा, भजी, कटलेट, वडापाव, सँडविच, व्हेज पुलाव, नॉनव्हेज बिर्याणी, व्हेज/नॉनव्हेज थाळी, कलिंगड आणि इतर फळं, चहा, कॉफी, मसाला दूध, कोल्ड ड्रिंक, दही, ताक, गुलाबजाम आणि रसगुल्ले इत्यादी. सगळं अगदी गरमागरम आणि फ्रेश. जरा या मुलांजवळ चौकशी करताच जेवण आणि इतके विविध पदार्थ सुंदर, चविष्ट आणि माफक दरात कसे असं विचारताच कळालं की,‘ आहुजा नावाचे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांनी इतकी छान सर्व्हिस ट्रेनमधल्या प्रवाशांना दिलीय.’ त्यांच्या या उत्कृष्ट सेवेबद्दल दोन वेळा त्यांना सन्मानित करण्यात आलंय असंही रेल्वेतील कर्मचा-यांनी सांगितलं. आम्ही जेवढा धंदा करु तेवढं आमचं कमिशन वाढतं. संपूर्ण महाराष्ट्रातच नाही तर भारतात यामडगाव मुंबई (कोकणकन्या)’ ही एकमेव अशी ट्रेन आहे जिच्यात खाद्यपदार्थांची इतकी सुंदर व्हरायटी आणि अनेक पदार्थांची नुसती रेलचेल आहे.

अर्थात सगळं जगभरातलं चाखूनही, मला मात्र सगळ्यात जास्त काय आवडत असेल तर महाराष्ट्रीयन आणि घरगुती पद्धतीचं जेवण. गरमागरम पोळी, वांग्याची भाजी, अळूची भाजी, मटकीची परतून केलेली उसळ, पालकाची ताकातली भाजी, ताकातला पडवळ, अंबाडीची लसूणाची फोडणी दिलेली भाजी, भरलेली भेंडीची काळ्यामसाल्याची भाजी, वांग्याचं भरीत. अहाहा! जगात मिळणा-या कुठल्याही जेवणापेक्षा मी हे जेवण अधिक पसंद करेन.

अच्‍युत गोडबोले भरल्या वांग्याच्या आठवणीत बुडाले आणि मी मात्र तुमच्यासारखीच अवाक् होऊन त्यांच्याकडे बघत राहिले.

दीपा देशमुख,

This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

Last Updated on Saturday, 12 February 2011 15:17
 

Created by Apoorv Deshmukh  Designed by Deepa Deshmukh